मनाचे आरोग्य
माणसाचे शरीर आजारी होण्याआधी त्याचे मन प्रथम रोगाला बळी पडते. सध्याच्या स्पर्धेच्या जमान्यात अनेक जणांना चिंता, काळजीने ग्रासलेले दिसते. यामुळे मानसिक व्यथा-रोग तर निर्माण होतातच; पण मानसिक स्थितीचा शारीरावर परिणाम होऊन ‘सायकोसोमॅटिक डिसीजीस्’ उद्भवतात.
प्रत्येक माणसाचा वेगळा असा एक स्वभाव असतो. काही अंशी चांगला आणि काही अंशी वाईट. काही गुण, काही अवगुण असलेला; पूर्ण कुणीच नाही. कधीकधी गुणांचा अतिरेकही दोष नाही का? आता हा स्वभाव कसा बनतो?
१. जन्मजात वैशिष्ट्ये.
२. भोवतालची परिस्थिती.
३. कौटुंबिक वातावरण, भावंडातील स्थान.
४. यशापयश, शारीरिक देणग्या, वैगुण्ये याचा मनावर होणारा परिणाम.
५. व्यवसाय, जबाबदाऱ्या यांचे होणारे परिणाम इत्यादी
अशा अनेक गोष्टीमुळे रोज आपण घडत जात असतो. कुणी हळवा, कुणी भित्रा, कुणी चिडखोर, मत्सरी, भांडखोर अशी अनेक स्वभाववैशिष्ट्ये आपण पाहतो; एकमेकांना सांगतो देखील.
१. ती ना फारच काळजी करत बसते.
२. त्याला आत्मविश्वासच नाही.
३. तो नेहमी उदास असतो.
४. त्याचे अभ्यासात अजिबात लक्ष नाही.
असं काहीतरी! पण आपण सर्वजण हे सगळं असंच चालणार असं समजून चालतो. त्याचा/तिचा स्वभावच तसला. त्याला इलाज नाही म्हणूनच गप्प बसतो. स्वभावाचे हे कंगोरे बरेचदा टोचतात. बोचतात. कधीकधी त्यांची परिणती मानसिक आजारात होते. मग या स्वभावाला औषध नाहीच का? आहे ना.
१. काही मानसिक व्यायाम.
२. डॉक्टर कडून आहारातील बदल करून घेणं.
३. शारीरिक व्यायामाची योग्य जोड.
४. मानसोपचार करून घेणं.
५. जीवनसत्त्व कुठली कमी आहेत त्याची तपासणी करून घेणं व उपचार.
६. जन्मजात मन-शरीराची वैशिष्ट्ये आणि भोवतालची परिस्थिती या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.
७. विचार करण्याची योग्य पद्धत, तत्त्वचिंतन.
८. ठराविक औषधी. त्यातल्यात्यात होमिओपॅथी.
९. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल.
म्हणूनच माझी आग्रहाची विनंती आहे की, शरीराइतकीच मनाची काळजी घ्या. स्वत:च्या मनावर व स्वभावाचा अभ्यास करा. त्यातील कंगोरे, दोष लक्षात घ्या. त्याची कारणं शोधा.
आपला सर्वांचा एक समज-गैरसमजच म्हणा की! खूप जाणवण्याइतके दोष, मनात, स्वभावात निर्माण झाल्याशिवाय कुणी डॉक्टरांकडे जात नाही. मानसोपचार करून घेणं म्हणजे जणू वेडेपणाचा शिक्का मारून घेणं असंच काही लोक समजतात. अर्थात आता ही धारणा थोडी बदलत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे शरीरावर साधा ओरखडा पडला, जखम झाली तर आपण उपचार करून घेतो नाही का? तर मग मनावर उपचार करून घेताना मागे पुढे बघण्याचेचं काहीच कारण नाही.
खरं तर, वेळीच उपचार न केल्यास शरीरावरील जखमा जशी चिघळत जाते. तशा मनाच्या जखमही चिघळत जातात व नंतर बऱ्या करण्यास वेळ लागतो; पण वेळीच उपचार केल्यास मानसिक आरोग्य योग्य राखण्यास मदत होते.
मनाचा शरीरावर व शरीराचा मनावर परिणाम होतो. म्हणूनच जितक्या सहजतेने शारीरिक तक्रारींचा काळजी घेता तितक्या सहजतेने मानसिक तक्रारींचाही विचार करा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका किंवा त्या लपवू नका. वेळीच दूर करा. मग पहा जीवन किती सुंदर वाटेल ते!
©श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ
Sound mind sound body