चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या युक्रेनच्या एक मित्राने जहाजावर कॉफी चा घोट घेत सहज एक वाक्य उच्चारले “दूर धुक्यामध्ये अंधूक अंधूक काय दिसते हे पाहणे आपले काम नाही तर, आज आपल्या समोर आहे ते करणे हेच आपले काम आहे.” सुंदरच!!!!
यानंतर जी चर्चा झाली ती एकदम अप्रतिम होती. जो भविष्याची काळजी, चिंता करीत असतो, त्यासाठी वाया घालविली जाणार्या ऊर्जेमुळे मानसिक तणाव आणि भावनिक चिंता आपला पाठलाग करू लागतात. मग चिंता निर्माण करणाऱ्या गोष्टी त्या त्या दिवशी वेगळ्या करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. चर्चेतून सुदंर गोष्टींचा उहापोह झाला जो मला सर्वांबरोबर शेअर करायला आवडेल.
१. उद्याचा अजिबात विचार करू नये. कारण उद्या आपला विचार स्वत: करेल. आजच्या वाईटासाठी आजचाच दिवस पुरेसा आहे. म्हणजे नेमके काय? उद्याचा विचार करा. होय, जराशा सावधानीपूर्वक करा. योजना आखा. तयारी करा, पण उद्याची चिंता करू नये.
२. कालच्या समस्यामुळे चिंतित होण्याऐवजी उद्याच्या समस्यांवर विचार करण्याने मी वेळेचा चांगला उपयोग करू शकतो. त्याऐवजी मी चिंता करायला लागलो तर मी जास्त दिवस टिकणार नाही ही भावना जोपासणे.
३. चांगले विचार, कारण आणि परिणामाचा विचार करतात. त्यांची योजना तार्किक आणि रचनात्मक असते.
४. वाईट विचार प्रामुख्याने तणाव आणि नर्व्हस ब्रेक डाऊनचे कारण होतात. त्यांना किती जवळ घ्यायचे ते पाहणे.
५. बुद्धिमान व्यक्तीसाठी दररोज एक नवीन जीवन असते. तो वेगळा, हटके विचार करतो.
मानवी स्वभावातील सर्वात मोठा कमकुवतपणा म्हणजे तो जीवन जगायला घाबरतो. नेहमी उगीचच चिडचिडेपणा, काटेकोरपणाचा आव, नको त्या विचारांना थारा देणं, बडेजाव, उगीचच खोटं बोलणं, हे सर्व आपल्याला चिंताजनक जीवनाकडे घेऊन जाते, कळत नकळत म्हणा..
किती विचित्र आहे नाही जीवनाचा प्रवास! आपण नेहमी ऐकतो की,
१. ‘लहान मूल म्हणते, ‘मी मोठा झाल्यावर..’
२. ते मोठे झाले की मग म्हणते, ‘मी कमवायला लागल्यावर…’
३. कमवायला लागल्यावर म्हणतो, ‘माझे लग्न झाल्यावर…’ लग्न होते. मग काय फरक पडतो?
४. आता त्याचा विचार बदलतो, ‘मी रिटायर झाल्यावर…’
आता खरोखरच रिटायर झाल्यावर तो मागे वळून आपल्या जीवन प्रवासाकडे पाहतो. त्याला थंड हवेमुळे कापरे भरते. काय माहीत कसे, पण आपण सर्व काही गमावले आहे. जीवन मागेच राहून गेले आहे. जीवन प्रत्येक क्षणासाठी जगायचे असते हे खूप उशिराने लक्षात येते. त्यामुळे आपण दर रोज, दर तासाला, दर क्षणाला जीवन जगायला हवे. आज जगण्यासाठी महत्त्वपूर्ण कारणं आहेत.
१. जीवन नेहमीच पुढे जात राहणार, झपाट्याने बदलत आहे.
२. आपले जगण्याचे कारण पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असते.
३. आपल्याला जीवनात आपला हेतू “शोधणे” आवश्यक नाही. त्यासाठी चिंता नको. चालता बोलता तो सापडतो.
४. आज जगताना आपण फक्त दयाळूपणा दाखवल्यास आयुष्याची वाटचाल सुलभ होते.
५. सर्वात आव्हानात्मक क्षण म्हणजे नकोशा गोष्टींना तोंड देणे. ते आपण टाळू शकत नाही. पण पर्याय देवाने दिलेलं असतात, त्यासाठी शांती आणि समाधान मार्ग काढण्यास मदत करतो.
६. स्वतः करिता जगणं आणि त्यातून कुटुंबीयांना जगवने महत्वपूर्ण.
७. जगात आपल्या मूल्याला कमी लेखून आपली मानहानी अजिबात नको. त्यातून नकारात्मता वाढेल.
आज फक्त तोच आनंदी आहे, ज्याच्यामध्ये आजला आपले म्हणण्याचे सामर्थ्य आहे. आत्मविश्वासाने भरलेला जो असे म्हणू शकतो, ‘उद्या तुला जे काही करायचे असेल ते कर, मी आज तर जगून घेतला आहे.’ बघा विचार पटतोय का?