मन आणि आहार

असा एकही दिवस जात नाही जिथे पालक आणि मुलांची अभ्यासाबाबत तक्रार नाही. समुपदेशन करताना मुलांची व्हिटॅमिन तपासणी करायला मी नेहमी सांगतो त्याला काही कारण आहेत. आहाराचा आणि मनाचा संबंध आहे ही गोष्ट फार जुनी. 

मनाचा आणि आहाराचा हा इतका निकटचा संबंध आपण बऱ्याचवेळा मनाआड करतो. तसंच प्रौढ व्यक्तीप्रमाणं मुलांनाही मानसिक व भावनिक तक्रारी असतात आणि अनेकदा ‘स्वभावच तसा’ किंवा ‘लहान आहे अजून’ असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. उपाय करणंही बाजूलाच राहतं. या सर्वांचा एकंदर व्यक्तिमत्त्वावर व अभ्यासावर निश्चितच परिणाम होतो.आता या गोष्टींचा आणि आहाराचा संबंध आहे असं म्हटलं तर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण पाहा.

१. रक्तातली ही साखरेची पातळी कमी झाली की काही लक्षणं उद्‌भवतात, एकाएकी गळून गेल्यासारखं वाटणं, थकवा येणं,मन खचून जाणं, जांभया येणं, विचारांचा गोंधळ, उगीचच चिडचिडेपणा, डोकेदुखी, औदासिन्य, आत्मविश्वास गमावणं, झोपेतून दचकून जागं होणं इत्यादी.

२. डोक्यात गोंधळ होणं, अचानक खचून जाणं, काहीही न सुचणं, विचार करण्याची क्षमता कमी होणं, मेंदू बधिर होणं वगैरे प्रकार मेंदूला प्रोटीन्सची कमतरता दर्शवतात.

३. कॅल्शिअमच्या कमतरतेमुळं चिडचिड, सतत असमाधान, झोप नीट न लागणं, हुरहुर, अनिष्ट होईल अशी भीती, काळजी, इत्यादी मानसिक लक्षणं उद्‌भवतात.

४. जेवणाच्या-झोपेच्या बाबतीतील चांगल्या सवयी अंगी बाणवणं यातच आपलं हित आहे.

५. स्मरणशक्ती, झोप, उत्साह, आनंद, वेदना, ऐच्छिक हालचाली इत्यादी बाबतीत न्यूरोट्रान्समीटर्स महत्त्वाची भूमिका बजावतात. साहजिकच हे पदार्थ पुरेशा प्रमाणात तयार होण्यासाठी काही द्रव्ये आहारातून नियमित व पुरेशा प्रमाणात मिळणं आवश्यक असतं आणि ही न मिळाल्यास मनोविकृती उद्‌भवल्या जातात.

६. मॅग्नेशिअम या क्षाराच्या पुरेशा पुरवठ्यामुळं परिस्थितीशी जमवून घेण्याची ताकद वाढते. मेंदूच्या समतोलासाठी हा क्षार अत्यंत आवश्यक आहे. या क्षाराच्या कमतरतेमुळं चटकन झोप न लागणं, दमल्या-थकल्यासारखं वाटणं, लिहिताना हात थरथरणं, अंग थरथरणं, स्नायूंमध्ये फडफड होणं, घाम फुटणं, थोड्याशा आवाजानं झोप मोडणं इत्यादी लक्षणं उद्‌भवतात.

७. काहीही कारण नसताना उगीचच ‘बरं न वाटणं’ ही भावना निर्माण होते तेव्हा पुष्कळ वेळा सुरुवातीस ‘ब’ गटाची जीवनसत्त्वं व लोह यांची कमतरता असल्याचं आढळतं. स्मरणशक्ती व आकलनशक्ती कमी होते तेव्हा मेंदूला कोलीन या ब गटाच्या जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.

८. बी-१ म्हणजेच थायामिनच्या कमतरतेमुळं मनाची एकाग्रता कमी होणं, विचारांचा गोंधळ, क्षीण स्मरणशक्ती, चिडचिड इत्यादी म्हणजेच झोपावंसं तर वाटतं; पण झोप लागत नाही अशी अवस्था निर्माण होऊ शकते.

९. बी-३ म्हणजेच पँटोथेनिक अ‍ॅसिडच्या कमतरतेमुळं स्वतःच्या दिसण्याकडे, पोशाखाकडे दुर्लक्ष, हट्टी, संशयी स्वभाव, अस्वच्छता, भांडखोर वृत्ती इत्यादी लक्षणं निर्माण होतात.

१०. फॉलिक अ‍ॅसिड व बी-१२-सायनोकोबालामिन यांच्या कमतरतेचाही महत्त्वाचा सहभाग मनोविकृतीच्या मुळाशी असतो.

या अशा बऱ्याच गोष्टींचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. वाईट एवढ्याचंच वाटतं की स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीपर्यंत, जिला या ज्ञानाची सर्वाधिक गरज आहे – जी आपल्या मुलांची, कुटुंबाची अन्नपूर्णा असते – तिच्यापर्यंत ही माहिती पुरेशी पोहोचत नाही. पालकांशी हितगुज करताना हा विषय महत्त्वाचा वाटला. आहाराचा आणि मनःस्वास्थ्याचा एवढा निकटचा संबंध आहे, एवढं पालकांना समजलं तरी पुरे! काय करावं ते पहा.

१. रक्तातील ग्लुकोजची पातळी योग्य राहण्यासाठी दिवसातून तीन-चार वेळा विभागून खावं. अन्न ठराविक वेळीच घ्यावं. खाण्यापिण्याच्या वेळा शयतो चुकवू नयेत.

२. दूध, डाळी, मोड आलेली कडधान्यं, अंडी, मटण, मासे इत्यादीतून मुख्यतः आपल्याला प्रोटीन्स मिळतात.

३. मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीनं कॅल्शिअम हे खनिज अत्यंत महत्त्वाचं.

४. कॅल्शिअमचं काम सुरळीत चालण्यासाठी फॉस्फरस, मॅग्नेशिअम, पूर्ण प्रथिनं (प्रोटीन्स) ‘क’ जीवनसत्त्व व विशेषतः ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. जीवनसत्त्व ‘क’ हे अधिक प्रमाणात दिलं असता असं आढळून येतं की, यामुळं बुद्धी तरल होते. आकलनशक्ती वाढते व झोप छान येते.

५. अभ्यास, वाचन, सतत प्रखर प्रकाशात काम करणं, टी.व्ही., सिनेमा पाहणं, मानसिक ताणतणाव इत्यादी बाबतीत ‘अ’ जीवनसत्त्व देण्याची गरज असते.

६. कोलीनचा पुरवठा लेसिथिन या अन्नद्रव्यापासून होऊ शकतो आणि लेसिथिन शरीरात निर्माण होण्यासाठी जीवनसत्त्व ई, क, बी-६ व फॅटी अ‍ॅसिडची सहायक म्हणून जरुरी असते. लेसिथिन हे सोयाबीन, अंडी, मेथी इत्यादीतून मिळते.

७. शरीरातील प्रत्येक प्रक्रियेसाठी पाणी हे इतके आवश्यक आहे की ते कमी घेतल्यास सर्वच क्रिया थंडावतात. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जात नाहीत. तेव्हा मुलांना आवर्जून पाणी भरपूर पिण्यास सांगा.

 

अन्नघटकांची उपलब्धी कशी असावी यावर जनजागृती आहे. आता वर्णन केलेले अन्नघटक आपल्या रोजच्या जेवणात असणं आवश्यक आहेत. हे अन्नघटक कशातून मिळवता येतात हे पाहा.

१. जीवनसत्त्व ‘अ’ – पिवळ्या सालीची फळं उदा. आंबा, पपई, संत्री, मोसंबी, गाजर, कोबी, फ्लॉवर, शेवग्याच्या शेंगा, पालेभाज्या व दूध, अंडी, लिव्हर इत्यादी प्राणिजन्य पदार्थ.

२. जीवनसत्त्व ‘ब’ – कोंड्यासकट तांदूळ, गहू, भाकरी वर्गाची पिठे व कडधान्ये सर्व भाज्या विशेषतः पालेभाज्या व यीस्ट.

३. जीवनसत्त्व ‘क’ – संत्री, आवळा, द्राक्षे, मोसंबी, लिंबू, आंबटगोड फळे.

४. जीवनसत्त्व ‘ड’ – दूध, लोणी, तूप, साय, कॉडलिव्हर ऑईल, लिव्हर, अंडी, मासे, सूर्यप्रकाश त्वचेवर पडणं.

५. जीवनसत्त्व ‘ई’ – तेलबिया, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, विशेषतः मूग, मटकी, मसूर इत्यादी.

६. खनिज लोह – सर्व हिरव्या भाज्या, कोथिंबीर, पुदिना, अळू, लालसर रंगाची खजुरासारखी फळे, काकवी, गूळ, कडधान्ये, बाजरी त्याचप्रमाणं कलेजी, मटण, मासे, अंडी इत्यादी मांसाहारी पदार्थ.

७. खनिज फॉस्फरस – तृणधान्ये उदा. गहू, तांदूळ, डाळी, भाकरीचं पीठ, दूध, मांसाहार, तेलबिया.

८. खनिज मॅग्नेशिअम – सालासकट असणारे सर्व धान्यप्रकार, पालेभाज्या.

९. खनिज कॅल्शिअम – दूध, नाचणी, चुना, तीळ, खसखस, शेंगदाणे, फ्लॉवर, बटाटे, कोबी व इतर सर्वच हिरव्या भाज्या, हाडांचं सूप इत्यादी.

या बरोबरच शारीरिक व्यायाम व सूर्यप्रकाश त्वचेवर पडणं आवश्यक असते. सर्वच बारीकसारीक अन्नघटकांची माहिती सांगणं शक्य नाही; परंतु महत्त्वाच्या घटकांचा विचार आपण केला आहेच. आजचा लेख लिहिण्या मागील एकमेव कारण म्हणजे मुलांच्या अभ्यासाच्या अडचणी आणि पालकांची डोकेदुखी.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *