चिंता आणि चिता

काळजी बाबत खूप काही लिहिलं गेलंय तरीही रोज कुणीतरी याबाबत प्रश्न घेऊन समुपदेशनासाठी येत आहेत.  

आपण काळजीच्या आहारी जाता कामा नये. बारकाईने पाहिल्यास काळजी म्हणजे काय? ती फक्त एक रोगीष्ट आणि विद्ध्वंसक सवय आहे. काळजी करण्याची सवय जन्मजात नसते. ती नंतर जडते. आपल्या व्यक्तिमत्वाला आतून पोखरणाऱ्या आणि नाना व्याधींचे माहेरघर असणाऱ्या चिंतेला हे चिंतापीडित लोक मनातून घालवून देऊ शकत नाहीत.

आपण काळजी करण्याच्या सवयीचा विचार इतक्या गांभीर्याने का करायला हवा?

१. चिंता म्हणजे आधुनिक काळातील प्लेग..

२. भीती हा मानवी व्यक्तिमत्वाला सर्वाधिक छिन्न-भिन्न करणारा शत्रू आहे.

३. मानवाला जडणारा अत्यंत सूक्ष्म आणि विघातक आजार म्हणजे काळजी.

४. ‘फालतू चिंते’मुळे आपण आजारी आहोत.

५. चिंता केवळ आपल्या मनातच असते असे नव्हे. आपले हृदय, मेंदू, आतडी हीदेखील चिंता करीत असतात.

६. आपल्या मानसिकतेवर घाव घातला जातो. आयुष्याला अर्थ रहात नाही.

आयुष्याची शंभरी पूर्ण केलेल्या ४५० लोकांच्या दीर्घायुष्याच्या रहस्याचा एका शास्त्रज्ञाने अभ्यास केला. त्याला आढळून आले की लोक पुढील कारणांनी समाधानी आणि दीर्घ आयुष्याचा उपभोग घेतात :

१) ते स्वत:ला कामात व्यस्त ठेवतात.

२) सगळ्या बाबतीत माफकपणा (संयम) पाळतात.

३) ते साधेसुधे आणि सौम्य वृत्तीचे असतात. ४) जीवनाचा आनंद ते मोठ्या प्रमाणात लुटतात.

५) लवकर झोपणे, लवकर उठणे नियमाचे पालन करतात

६) ते भीती आणि चिंतामुक्त असतात, विशेषत: त्यांना मृत्यूची भीती नसते.

७) त्यांचे मन शांत, प्रसन्न असते आणि ते देवावर श्रद्धा ठेवतात.

ज्याप्रमाणे कोणतीही सवय आणि शिकलेली गोष्ट बदलता येते त्याचप्रमाणे काळजीसुद्धा मनातून काढून फेकून देता येते. ही सवय मोडून काढण्यासाठी आक्रमक आणि प्रत्यक्ष कृती करणे गरजेचे असते आणि तिच्यावर परिणामकारक वार करण्याची एकच वेळ योग्य असते- आत्ता. तर चला, आपली काळजी करण्याची सवय मोडायला प्रारंभ करूया.

१. लहानसहान चिंतेच्या फांद्या छाटल्या की आपण तिच्या मुख्य खोडावर घाव घालू शकु. त्यानंतर आपल्या विकसित शिक्षण, व अनुभव यांचा वापर करून मूलभूत चिंतेला, चिंता करण्याची आपल्या सवयीला कायमची नष्ट करू शकू.

२. आधी छोट्या काळज्या आणि त्यांच्याबद्दल बोलणे यांच्यावर हल्ला करायचा. उदा. आपल्या संभाषणातून चिंता व्यक्त करणारे शब्द गाळणे, कमी करने.

३. आतापर्यंत आपण ज्याविषयी नकारात्मक बोलत आलो आहोत, त्याबद्दल सकारात्मक बोलायला हवं. सकारात्मकच बोला.

४. आशावादी लोकांशी मैत्री जोडने. सकारात्मक, श्रद्धा निर्माण करणारे विचार करणाऱ्या आणि सृजनात्मक वातावरण निर्माण करण्यात हातभार लावणाऱ्या लोकांच्या संगतीत राहणे योग्य.

५. इतर किती लोकांना त्यांची चिंता करण्याची सवय सोडण्यात आपण मदत शकतो ते पाहणं गरजेचं. चिंतेवर मात करण्यासाठी इतरांची मदत करता करता ती शक्ती तुमच्यातही वाढू लागते.

६. चिंता आणि चिता या दोन्ही शब्दात फक्त अनुस्वाराचाच फरक आहे.हे लक्षात ठेवले तरी उत्तम.

७. चिंता ही एक वाईट मानसिक सवय आहे आणि समुपदेशन, प्रार्थना, वरिष्ठांचा आशीर्वाद या मदतीने आपण कोणतीही सवय बदलू शकतो हा विश्वास.

एकदा एक जण बोलून गेला की सांगणं सोपं असतं पण त्यावर प्रभावीपणे अंमलबजावणी करणे कठीण. इथेच गणित चुकतंय. जे करतात तेच जिंकतात. फक्त बोलून काही होत नाही, त्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. फाजील आत्मविश्वास दूर ठेऊन लवकर जमिनीवर आलो तरच चिंतेहून चितेकडे जाण्याचे टळेल.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *