फालतू गप्पा

असच एका ग्रूपमध्ये चर्चा करताना अनेक जण फालतू गप्पा मारणारे होते. त्यातून थोडा गप्पांचा कल दुसरीकडे जायला लागला म्हणून आम्ही चर्चा थांबवली. थोडं थांबून पुन्हा फालतू गोष्टींचा आपल्यावर होणारा परिणाम यावर मी चर्चा सुरू केली व सर्वांच्या चर्चेतून अनेक तथ्य समोर आली. 

फालतू गप्पा म्हणजे,

१. इतर लोकांबद्दल नकारात्मक चर्चा करणं. या विचार-विषाचं भक्ष्य असणाऱ्या व्यक्तीला, त्यातच आनंद वाटायला सुरुवात होते.

२. इतरांबद्दल नकारात्मक बोलण्यातून एक प्रकारचा जहरी, आसुरी आनंद त्याला मिळायला लागतो आणि असं करण्यामुळे यशस्वी लोकांना आपण आवडेनासे होतो आहोत आणि त्यांच्या दृष्टीनं आपली विश्वासार्हता कमी होते आहे, हे त्याला कळतच नाही.

३. अशा लोकांना लोक जवळ करत नाहीत व दूर ठेवतात.

४. त्याचा फक्त टाईमपास साठी उपयोग करतात पण ते त्याला कळत नाही.

५. उगीच एखाद्यावर चिखलफेक करून आपण एक पाप त्याच्या ध्यानात येत नाही.

मग इतर लोकांबद्दल बोलायचंच नाही का? होय, बोला पण सकारात्मक बाजूनं.

एक गोष्ट स्पष्ट आहे, सगळ्याच चर्चा म्हणजे गप्पा नव्हेत. मोठाल्या बाता मारणं, दिखाऊ बोलणं आणि वाद-विवाद काहीवेळा आवश्यक असतात. ह्या गोष्टी विधायक असतील, तर त्या उपयोगी ठरतात. मग फालतू गप्पा मारण्याकडे तुमचा कल आहे का, हे तपासून बघण्यासाठी एक चाचणी आम्ही ग्रुप मध्ये करून घेतली. तुम्हीपण करून पाहा.

१. मी इतर लोकांबद्दल कंड्या पिकवतो का?

२. इतरांबद्दल मी नेहमी चांगलंच बोलतो का?

३. एखाद्या भानगडीविषयी ऐकायला मला आवडतं का?

४. इतरांबद्दल मत बनवताना मी सत्याचा आधार घेतो का?

५. अफवा घेऊन माझ्याकडे येण्यासाठी मी इतरांना प्रोत्साहन देतो का?

६. ‘कुणाला सांगू नकोस’ अशा शब्दांनी मी माझं सभाषण सुरू करतो का?

७. खाजगी गोष्टी मी खाजगीच ठेवतो का?

८. इतरांबद्दल मी जे बोलतो, त्याबद्दल मला अपराधी वाटतं का?

या प्रश्नांची योग्य उत्तरं सर्वज्ञातच आहेत. शेजारच्या घरातलं टेबल, खुर्च्या आदी सामान एक कुऱ्हाड घेऊन तोडून-मोडून टाकण्यानं तुमच्या घरातलं सामान चांगलं दिसणार नाही, त्याचप्रमाणे, दुसऱ्या माणसावर शाब्दिक हत्यारं चालवण्यानं तुम्ही किंवा मी अधिक चांगले ठरणार नाही. यावर फालतू गप्पा मारताना विचार करायला हवा आणि स्वतःला बदलायला हवं.

१. उच्चतेची कास धरणे, हा आपण करत असलेल्या कुठल्याही गोष्टींमध्ये पाळण्याचा एक सर्वोत्तम नियम आहे.

२. कळत-नकळत का होईना, पण लोक आपल्या दर्जाचं मूल्यमापन करत असतात. म्हणून आपला वैचारिक दर्जा उच्च ठेवणे योग्य.

३. आपल्या वातावरणाबाबत सजग राहणं गरजेचे.

४. आपल्या वातावरणाला आपल्या विरूद्ध नव्हे तर स्वतःच्या बाजूनं कामाला लावणं यातच शहाणपण.

५. खुज्या विचाराच्या लोकांपासून दूर राहणे उत्तम. त्यांना आपले पाय ओढू देऊ नका.

६. भरपूर मानसिक सूर्यपकाश मिळवणे आवश्यक.

७. आपल्या वातावरणातून विचार-विषाला हद्दपार करा. नकारात्मक गप्पांपासून दूर राहिल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले राहते.

अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला करता येतात व आपली प्रतिमा चांगलीं होते. नकारविर चोहीकडे असतात. पण त्यांना किती जवळ करायचं ते आपल्याच हाती असते.

लक्षात ठेवा, आपले व्यक्तिमत्त्व बोलके असते. ते तेच बोलेल जे आपण विचार करतो. म्हणून चांगले आचार विचार ठेवायला शिकणे आणि त्यावर विश्वास ठेऊन पावलं उचलणे आवश्यक. चला तर मग, पाहू आपण कुठे आहोत…

 

©श्रीकांत कुलांगे.

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *