सत्याचा स्वीकार

आपल्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात, इतरांनी आपले ऐकावे, आपला आदर करावा, भावनांची कदर करावी असे वाटणारी एक व्यक्ती आज समुपदेशन घेण्यासाठी आलेली. त्याचे दुःख त्याने सांगून त्यावर उपचार काय असा प्रश्न विचारला. आपण ज्या जगात वावरतो ते योगायोग आणि संभाव्यता यांनी व्यापले आहे. तसे असूनही जीवनात आनंद अनुभवता येतो. परिपूर्णता आणि निश्चिती यांचा अट्टाहास व्यर्थ. अर्थात काहीअंशी त्यांच्या बोलण्यात तथ्य असले तरी त्यांचा हट्टी स्वभाव लक्षात आला.
वास्तविक असा हट्ट असणार्‍यांनी वास्तवाकडे डोळसपणे पाहिले तर बऱ्याच कटू गोष्टी लक्षात येतील.

१. जग आपल्याप्रति तटस्थ आणि बेपर्वा आहे.

२. अगदी जवळच्या व्यक्तींकडूनही आदर आणि प्रेम कधीमधीच मिळत असते, कायम नाही आणि जे मिळते तेही उत्स्फूर्त आणि खरेखुरे असेलच असे नाही. बरेचदा ते औपचारिक, दिखाऊ आणि नाटकी असते.

३. अत्यंत जिव्हाळ्याच्या व्यक्तीदेखील त्यांच्या गरजा, समस्या आणि प्राथमिकता यातच गुरफटलेल्या असतात.

४. तुमच्या गरजा आणि आनंद त्यांना कायम महत्त्वाचे वाटतील असे नाही.

५. कधीकधी तर त्यांच्या वागण्यांत आपल्याबद्दल आदर, उदारता आणि कणव यांचा अभाव दिसतो.

 

वास्तव इतके कटू आणि कठोर असताना आपली इतरांकडून परिपूर्णता, संवेदनशीलता आणि निश्चितीची मागणी समर्थनीय कशी म्हणता येईल यावर आम्ही चर्चा केली. भावनिक दुरावस्था आणि त्यामुळे सक्षमपणे जगण्यात होणारा विरोध कमी करायचा असेल, तर स्वत:प्रति तसेच इतरांच्या बाबतीत आपली सहनशीलता वाढवायला हवी. त्यासाठी,

 

१. स्वत:ला बदलण्याची तयारी असणे.

२. इतरांविषयी सकारात्मक मत बाळगणे.

३. राईचा पर्वत किंवा छोट्या-मोठ्या गोष्टींचा बागुलबुवा करणे अहिताचे.

४. वस्तुस्थितीचे भान. तुमचे ‘वाटणे’ आणि ‘वास्तव’ यात अंतर असू शकते हे लक्षात ठेवने गरजेचे.

५. स्वत:ला इतरांच्या जागी कल्पून त्यांचं वागणं समजून घेता येतं. गैरसमज निर्माण होत नाहीत.

६. झटपट परिणामांचा हव्यास सर्वथा अवाजवी ठरतो. दृष्टिकोनात सकारात्मक बदलाला सुरुवात केली की, आपल्याला लगेच त्याचे परिणाम हवे असतात. थोडा वेळ द्या.

७. परिवर्तनाचा स्वीकार. जग बदलतंय.

८. आपल्या भावना, आपले विचार आणि कृती यांची जबाबदारी स्वत:कडे घेणे अधिक महत्वाचं.

९. बोलण्यात आग्रही वाक्प्रचार टाळणे फायद्याचे ठरते. ‘नेहमीच’, ‘कदापिही नाही’, ‘व्हायलाच पाहिजे’, ‘घडायलाच नको’, ‘असे कसे होत नाही’, याऐवजी, ‘केव्हा केव्हा’, ‘बहुधा’, ‘घडलं तर आनंद; पण न घडलं तर फारसं बिघडलं नाही’, हे वाक्य वापरण्यास सहज शक्य आणि लाभकारक ठरते.

१०. परिस्थितीकडे डोळसपणे पाहणे.

११. चुकीचा दावा करण्याचे टाळणे.

१२. गैरसमज दूर करणे.

 

एकूण काय तर, परिपूर्णतेचा आणि निश्चितीचा अट्टाहास आपल्या मानसिक स्वास्थ्याला मारक ठरणार. ‘मी म्हणेन ती पूर्व’ ‘हम करे सो कायदा’, ‘मेरे मुरगी की एकही टांग’ इत्यादी म्हणींमधून प्रतीत होणारी एककल्ली, जुलमी, दुष्टाग्रही आणि हुकूमशाही वृत्ती तुम्हाला कधीच हवं ते मिळवून देऊ शकत नाही शिवाय सुखही लाभू देणार नाही. यांची यथार्थता पटविणारे हुकूमशहांचे दाखले इतिहासात खूप सापडतील. त्यापेक्षा आपल्या जागृत धारणेला, विवेकी आणि वास्तव रूप दिले, तर समस्या सोडवणे सरळ होईल व सुखाची शक्यता वाढेल.

 

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *