कुत्सित बोलण्यामध्ये विनायकरावांचा हात कोणीही धरू शकणार नाही. भांडी घासता-घासता त्यांच्या पत्नीनं हॉलमध्ये येऊन जर विचारलं, ‘‘कोणती सिरियल चालू आहे हो?’’ तर ते उत्तर देतात, ‘‘आमची गोमू भांडी घासते!’’ असे बोलून त्यांना काय सिद्ध करायचे असते याचा मुळी थांगपत्ताच लागत नाही. त्यांच्यासारखी कुत्सित बोलणारी, हेटाळणी करणारी, इतरांना तुच्छ लेखणारी आणि इतरांना त्रास देऊन त्यामध्ये खूश होणारी माणसंदेखील आपल्याला दुर्दैवानं अवती-भवती दिसतात. कुत्र्याच्या शेपटीला फटाके बांधून त्याच्या कोकलण्यावर हसणारी ही माणसं!
गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा परिसस्पर्शही त्यांना झाला नसावा. वाटमारीसाठी अनेकांना यमसदनी पाठविणाऱ्या दरोडेखोराला जेव्हा गौतम बुद्धांनी पिंपळाची तीन पानं तोडून आणण्यासाठी सांगितले तेव्हा हे अगदी सोपं असणारं काम त्यानं तात्काळ केलं आणि त्यानंतर त्याला सांगण्यात आलं, ‘‘ही पानं आता त्याच झाडावर परत लावून ये.’’ हे काम अर्थातच अशक्य होतं. त्यावर गौतम बुद्धांनी त्याला विचारलं, ‘‘जर पान पुन्हा लावणं तुला करता येत नाही, तर ते तू तोडावंस तरी का?’’ त्या दिवसापासून त्यानं लोकांना ठार करणं सोडून दिलं.
समोरच्या व्यक्तीला दोष देऊन मनाला लागेल असे बोलू नये किंवा कृती करू नये.
१. इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल करता येणं शक्य नसेल तर किमान त्यांना आयुष्यात क्लेश तरी देऊ नयेत.
२. नसेलच कुणाला मदत करण्याची इच्छा तर किमान त्यांना त्रासात तरी ढकलू नये.
३. एखाद्याच्या शारीरिक व्यंगांवर उपहासात्मक बोलणं, कौटुंबिक परिस्थितीवरून टोमणें मारणं. काय गरज आहे?
४. एखाद्याबाबत विनाकारण गॉसिपिंग करणं अशा बाबी तरी किमान नक्कीच टाळायला हव्यात,
५. मानसिक त्रासाकडे जाण्याचा हा हमखास मार्ग. ज्या व्यक्तीबाबत आपण बोलतो ते बोलण्याचा आपल्याला अधिकार वास्तविक असतो हे कुणी सांगितलेय?
अशा कुर्सित बोलण्याने ज्या व्यक्ती इतरांना तुच्छ लेखून आपले मनोरंजन करून घेतात किंवा अधिकार गाजवतात, त्यांना त्याचे फळ देखील याच आयुष्यात मिळते हे समजत नाही. अशा व्यक्तींचे दुर्दैवी कुचके बोलणे जिव्हारी लागणारी असते. पण ते असं का करतात यावर देखील काही संशोधन झाले आहे.
१. नकारात्मक भावनेतून बोलणारी माणसे बऱ्याचदा स्वतः मानसिक रोगाचे बळी असतात.
२. बोलण्याची पद्धत आहे हे त्यांना नंतर समजते व तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
३. मनस्ताप अशा लोकांना कमी वेळा होतो म्हणून त्यांच्या बोलण्याचा सराव सातत्याने होत असल्या कारणाने तो स्वभाव बनतो.
४. देव शिक्षा देतो ही भावना न समजणे. कदाचित अशी माणसे देवाने मुद्दाम बनवली की काय अशी शंका निर्माण होते.
५. विकृत आनंद मिळतो अशी मेंदूला लागलेली सवय.
६. अपूर्ण माहितीचा परिणाम. पूर्ण माहिती न घेता बोलण्याचा स्वभाव.
७. इतरांच्या संघर्षाचा इतिहास माहिती नसणं.
८. समोरील व्यक्तीला आपल्या अधिकारात किंवा धाकात ठेवण्याची प्रवृत्ती.
नकळतपणे एखाद्यावेळेस बोलून गेलो तर क्षमा मागून मोकळे होतो. परंतु काहीजण क्षमेच्या जवळ जायला घाबरतात. त्यांना हे समजत नाही ही के ते किती अक्षम्य चूक करत आहेत. अशा माणसांना सांगू इच्छितो की ‘‘हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे? हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दु:ख ठावे’’ याची सहसंवेदना एकदा मनात जागवून तर पहा.
©श्रीकांत कुलांगे
9890420209