आळस काय जात नाही म्हणून बरेचजण करायची कामे टाळून झोपी जातात नाही तर उद्यावर ढकलतात. मेहनतीनं संपत्तीमध्ये वृद्धी होते, तर आळशीपणानं दारिद्रय उभं ठाकतं. हे माहीत असून सुध्दा आपण आळशीपणा का करतो यावर बरच संशोधन केले गेले. आणि आश्चर्य वाटणारी सत्य समोर आली.
१. आळशी लोक प्रत्यक्षात अत्यंत कार्यक्षम असतात.
२. अधिक उत्पादनक्षम होण्यासाठी छोटीशी झोप ही एकमात्र गुरुकिल्ली आहे.
३. स्मार्ट लोक आळशी होण्याची अधिक शक्यता असते.
४. आळशी असणे म्हणजे वास्तववादी असणे. आळशीपणा नैराश्यासारखे नसते.
५. आळशी असणे हे एक विनामूल्य आरोग्य आणि भलं करण्याचं साधन आहे. थोडक्यात विश्रांती.
६. आळशी म्हणजे शांत बसणे आणि काहीही न करणे. म्हणून, आळशी असणे म्हणजे चिंतनासारखे आहे.
७. आळशी लोक एकच गोष्ट चांगली करतात. एकाचवेळी अनेक गोष्टी करणारे कित्येकदा चुका करतात.
बिल गेट्स, म्हणतो की मी आळशी माणसाला सगळ्यात कठीण काम देतो कारण ते लोक हे काम पटकन करून टाकतात. अर्थात शास्त्रीय कारण यामागे असले तरी आळशीपणा काही दृष्टीने समाजात, कुटुंबात भांडणाचे कारण जरूर बनते. म्हणून एक संतुलित व्यक्ती होण्याचा प्रयत्न करून बघायला हरकत नाही.
१. स्वतःला योग्य प्रश्न विचारा की हे काम कशा प्रकारे करू शकतो.
२. सुस्त मनोवृत्तीचा मनुष्य कुठलीही गोष्ट मीठमसाला लावून सांगत असतो. आपणास आपली बढाई मारण्याची सवय सोडावी लागेल.
३. आपल्या आयुष्यावर एक दृष्टिक्षेप टाकला तर आढळून येईल, आपण कोणकोणत्या गोष्टी आजवर टाळत आलेलो आहोत. विचार केला तर समजेल की आपल्याकडे चॉइस होत्या.
४. आळशीपणामुळे होणाऱ्या परिणामांचं अवलोकन होणे गरजेचे.
५. मनाला उल्लू बनवणे सोडून द्यायला हवं. आपलाच वेळ वाया जातो.
६. डार्विनचा सिद्धांत सांगतो की जे वापरले जात नाही ते संपुष्टात येणार. म्हणून आहे त्याचा वापर ८०% करण्यात आला तरी खूप.
७. काही लोकांमधील सुस्तीचं प्रमुख कारण असमतोल आहारविहार, अवास्तव, बेसुमार खाण्यापिण्याच्या सवयी असू शकतात. ही सुस्ती नियंत्रित करण्यासाठी त्यांनी डाएटीशियन सल्ला अवश्य घ्यावा.
८. मानसिक स्वास्थ्य खराब असेल तर समुपदेशन महत्वाचं.
९. अवास्तव वजन वाढून कालांतरानं शारीरिक हालचाली करण्याचेही कष्ट पडू लागतात.
लोकांमध्ये शक्तीची नव्हे, तर इच्छाशक्तीची कमतरता असते. लोकांच्या जीवनात ‘करा किंवा मरा’ अशी स्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा ते अशक्यप्राय कामंही सहजगत्या पार पाडतात. नंतर त्यांच्यात आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.
‘ज्यांची धारणा ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी अनुकूल आहे, त्यांनाच त्या लाभतात. ज्यांची घेण्याची इच्छा नसते, त्यांच्याकडून आधी असणाऱ्या गोष्टीही हिरावून घेतल्या जातात.’
©श्रीकांत कुलांगे
9890420209