बुद्धिमत्ता कमी आहे आणि ती वाढविण्या साठी काही करू शकतो का म्हणून पालक मुलासोबत आले होते. त्यांना अगोदर समजाऊन सांगावे लागले की बुद्धिमत्ता म्हणजे नेमके काय.
१. योग्यता (Aptitude)
२. कौशल्ये (skill).
३. प्रतिभा (talent) यांचे एकत्रीकरण म्हणजे बुद्धिमत्ता.
अर्थात त्यांच्या मुलामध्ये नेमके काय कमी आहे हे एका चाचणीद्वारे समजू शकते. थोडक्यात,
१. शिकण्याची क्षमता. जे अनुभव आपण घेतो त्यांना लक्षात ठेवतो आणि वापरात आणतो.
२. समस्या ओळखण्याची क्षमता. कुठल्या संभाव्य समस्या येऊ शकतात किंवा सध्या आहेत याचे आकलन.
३. समस्या सोडवण्याची क्षमता. आपल्या अनुभवातून समस्या सोडवण्याची कृती.
ज्याला या गोष्टी सहजासहजी करता येतात त्या व्यक्तीला आपण बुद्धिमान म्हणू शकतो. शाळा, कॉलेज, ऑफिसेस आणि फॅक्टरी मध्ये बऱ्याचदा यांची चाचणी घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाते. ज्यांना वरील तीन गोष्टी अतिशय योग्य पद्धतीने करण्याची क्षमता असते त्यांना अतिउच्च श्रेणीचा जॉब भेटतो.
अर्थात याविषयी जगभरात खूप अध्ययन झाले, नवीन गोष्टी समोर आल्या.
प्राथमिक मानसिक क्षमता, यामध्ये सात वेगवेगळ्या क्षमता पुढे आल्या.
१. लक्षात ठेवण्याची आणि आठवण्याची क्षमता.
२. अंकगणित समस्या सोडविण्याची क्षमता.
३. वस्तूंमध्ये फरक आणि समानता पाहण्याची क्षमता.
४. नियम शोधण्याची क्षमता (reasoning)
५. कल्पनाशक्ती व त्यांचा परस्पर संबंध स्थापन करण्याची क्षमता.
६. शब्द समजून घेण्याची क्षमता.
७. शब्द वेगाने तयार करण्याची क्षमता.
बऱ्याच संशोधकांनी बुध्दीमत्ता शोधण्यासाठी एकत्र येऊन काम केले. हॉवर्ड गार्डनरचा एकाधिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत सांगतो की एकूण आठ प्रकार आहेत.
१. आपल्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आणि वस्तू कुशलतेने हाताळण्याची क्षमता.
२. इतरांच्या मनःस्थिती, प्रेरणा आणि इच्छांना योग्य प्रकारे ओळखण्याची आणि प्रतिसाद देण्याची क्षमता.
३. स्वत: ची जाणीव ठेवण्याची आणि अंतर्गत भावना, मूल्ये, श्रद्धा आणि विचार करण्याच्या प्रक्रियांच्या अनुषंगाने कार्य करण्याची क्षमता.
४. वैचारिक आणि अमूर्त विचार करण्याची क्षमता आणि तार्किक किंवा संख्यात्मक नमुन्यांची ओळखण्याची क्षमता.
५. वाद्य व ताल ओळखण्याची क्षमता.
६. प्राणी, वनस्पती आणि इतर नैसर्गिक वस्तू ओळखण्याची आणि त्यांचे वर्गीकरण करण्याची क्षमता.
७. शब्दांची ध्वनी, अर्थ आणि लय यांच्याशी विकसित केलेली शाब्दिक कौशल्ये आणि संवेदनशीलता.
८. प्रतिमा आणि चित्रांपासून विचार करण्याची व त्यांचे अचूक दृश्यमान करण्याची क्षमता.
अशा अनेक बुद्धिमत्तेचा पसारा पाहून पालकांचे डोळे दिपतात. परंतु या गोष्टी निसर्ग नियमित असून त्यांची ओळख कळत नकळत आपल्या मनावर होत असते. फक्त या गोष्टी आपण मनावर घेत नाहीत. मुलं लहानपणी काय पाहतात, ऐकतात, शिकतात त्यावर त्यांची बुध्दीमत्ता वाढत जाते. अर्थात पुढे जाऊन अशा गोष्टींचा अभ्यास केला तर नक्कीच मुळात असलेली बुध्दीमत्ता विकसित करू शकतो.
©श्रीकांत कुलांगे
9890420209