मला हवं ते मिळत नाही किंवा करता येत नाही आणि माझा जीव गुदमरतो म्हणून कित्येक लग्न झालेल्या मुली, मुलं तक्रार करताना दिसतात. त्यातून मग होणारी भांडणे, रुसवा, ते थेट घटस्फोटापर्यंत नातं येऊन थांबते. निराश होऊन काही जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. खरंच निराश होणं गरजेचे आहे? आपणास पाहिजे असलेले न मिळणे ही एक वेदनादायक आणि निराशाजनक अनुभव असू शकतो. पण त्यामागे काही करणे असू शकतात हे त्या व्यक्तीला लक्षात येत नाहीत.
१. वास्तवात कुटुंब प्रक्रिया आणि स्त्रीचे स्थान पिढ्यान् पिढ्या चालत असलेल्या चाकोरीबद्ध जीवनात अडकून पडले आहे. घर आणि नोकरी स्त्रीला काही कारणास्तव हाताळणे कठीण होते मग हवं ते करता येत नाही आणि निराश मन होतं.
२. काहींना वेड असते जे हवे ते मिळवण्याचे. नाही मिळाले की निराश होणार. कितेयकदा बारीक बारीक गोष्टी मनासारख्या नाही झाल्यातरी त्रास होतो.
३. आर्थिक टंचाई.
४. जोडीदाराची मानसिकता. कमकुवत नात्यामध्ये असे घडताना आढळते. असून सुद्धा समोरील व्यक्तीची जाणीवपूर्वक इच्छापूर्ती न करण्याकडे एखाद्याचा कल असतो.
५. जोडीदाराने होऊन इच्छा पूर्ती करण्याची इच्छा बळवणे. मी नेहमी का मागावं? तिने किंवा त्याला समजत नाही का मला काय हवंय…अशी इच्छा निराश करते.
६. मानसिक किंवा शारीरिक व्यंग आपल्याला काही गोष्टी करणं शक्य असून सुद्धा करता येत नाहीत म्हणून निराश होतो.
७. वडीलधारी मंडळी आडकाठी आणतात म्हणून राग पण येतो. त्यामागील कारणे लक्षात न आल्याने निराश बनतो.
८. समाजात वावरताना हे करू नको ते करू नको असे अनेक प्रकार घडल्याने तरुणाई ला निराशेचा सामना करावा लागतो.
एक ना अनेक त्रासदायक वातावरणामध्ये हवं ते साध्य झाले नाही तर मानसिक स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते. मग परिणाम दिसायला लागतात.
१. चिडचिड, आदळआपट, जळफळाट कृतीतून, हावभाव, बोलण्यातून व्यक्त होतो.
२. मानसिक संतुलन बिघडते.
३. काय कुठे बोलतो हे लक्षात येतं नाही.
४. जेवण आणि झोप यांची गल्लत होते.
५. त्यातून शारीरिक व्याधी दिसतात. डोळे, चेहरा, एकूण देहबोली, नकारात्मक विचार आपल्याला व्यक्तिमत्वात बदल करतात.
६. भांडणं व्हायला वेळ व काळ विसरून सुरुवात होते.
७. जिद्दी स्वभाव बनतो. किंबहुना जिद्दी स्वभावामुळे हट्ट कायम राहतात. त्यातून अहंभाव पराकोटीला पोहोचला की मनोविकृती उत्पन्न होते. मग आत्महत्या करण्याचे विचार प्रवृत्त होतात.
८. इतरांचा विचार न करण्याची वृत्ती घातक त्यामुळे राग, ताण व उदासीनता वाढतो. घटस्फोट पर्यन्त वेळ येते.
कारणे काहीही असोत परंतू सारासार विवेकबुद्धी जर असेल तर आपण या निराश वातावरणात सुध्दा आपल्या इच्छा या नाहीतर दुसऱ्या प्रकारे हाताळू शकतो. परंतु ज्यांना असे निराश होणे नेहमीचे आहे अशा व्यक्तींनी आपल्यात बदल करणे आवश्यक आहे.
१. जिद्द आणि हट्टी स्वभाव जाणून घ्या. त्यावर योग्य उपचार समुपदेशन आणि थेरपी द्वारे होऊ शकतात.
२. प्रेमात दिलदार वृत्ती, विना तक्रार असायला हवी ही जाणीव.
३. समोरील व्यक्तीच्या काही समस्या असू शकतात याकडे लक्ष दिले पाहिजे.
४. हवं ते ना मिळणे यामागे काहीं कारण असू शकतात याबाबत विचार केल्यास त्रास कमी होतो.
५. वाजवी अपेक्षा पेक्षा जास्त अपेक्षा मानसिक त्रासाला निमंत्रण देते म्हणून आहे त्यात समाधान मानल्यास त्रास होत नाही.
६. इतर गोष्टीमध्ये मन गुंतवणे. छंद जोपासले तर चांगलेच.
७. जे आहे त्यात समाधान. नाविण्याकडे लक्ष द्या.
८. व्यायाम, मेडीटेशन, योगा इत्यादी मनोरोग दूर ठेवतात. स्वतःच्या विचारांवर नियंत्रण येते.
९. घटस्फोट किंवा एकत्र कुटुंबातून फक्त या कारणासाठी विभक्त होणे, हे किती योग्य याचा सारासार विचार करूनच निर्णय घेतला तर चांगले.
१०. वरिष्ठांनी आता काळ वेळ बदलला आहे हे लक्षात ठेऊन तरुणाईला मदत केल्यास असे प्रश्न उत्पन्न होणार नाहीत.
काही गोष्टी आपल्या हातात असतात तर काही नसतात. समजदार व्यक्ती समाज आणि कुटुंब व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी घेतात. आपण सर्वांनी निस्वार्थ आणि त्याग भावना जोपासल्या तर आयुष्यात निराश मन होणार नाही. अपेक्षाभंग हे मूळ कारण आहे त्रासाचे. वास्तववादी राहुन विचार केल्यास निराशा दूर पळून जाईल.
©श्रीकांत कुलांगे
9890420209