नैराश्याबरोबर जगणे

प्रवासात एक व्यक्ती भेटली जी पूर्णार्थाने नैराश्याने ठासून भरलेली. बोलता बोलता त्याने आपल्या नैराश्याची अनेक कारणे सांगितली. परंतु वास्तवात ते दाखवत नव्हता. कदाचित त्याने परिस्थितीचा स्वीकार करून पुढे चालायचे ठरवलेलं असावं. आयुष्यात अनेक प्रसंग, घटना पावलोपावली आपले नैराश्य (डिप्रेशन) वाढवत असते. काहींना आपण निकालात काढतो तर काही आपल्याला निकालात काढतात. गेल्या काही दिवसापासून सवंगडी ८४ नावाच्या ग्रुप बरोबर संवाद होत आहेत आणि प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव ऐकून थक्क व्हायला लागलं की कळत नकळत त्यांनी साध्या सोप्या प्रयोगातून नैरश्याबरोबर कसं जगावं याचा परिचय दिला. अनेक प्रयत्न आपण करू शकतो.

१. आपला एक सपोर्ट ग्रुप तयार करणे. त्यातून संवादाची पेरणी. एकमेकांची दुःख सांगून मन मोकळे करायला चांगला प्लॅटफॉर्म.
२. तणाव व्यवस्थापन – जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल नावाचे संप्रेरक उत्पन्न करते. जे आपल्या तणावाला नैसर्गिकरित्या कमी करते. याचबरोबर अवांतर तणाव व्यवस्थापन गरजेचे.
३. झोपेचे व्यवस्थापन – स्वच्छ / नीटनेटकी झोपेची जागा आपल्याला पुरेशी आणि चांगल्या प्रतीची झोप पूर्ण करते. इलेक्ट्रॉनिक वस्तू झोपेच्या एक तास आधी बंद करून मंद प्रकाशाची अनुभूती घेत संगीत, वाचन आपल्याला मानसिक शांती देते.
४. आपल्या खाण्याच्या सवयीत सुधारणा – चांगले जेवण आणि मानसिक आरोग्य यांचे खूप जवळचे संबंध आहेत.
५. नकारात्मक विचार कसे थांबवायचे ते शिकणे गरजेचे. हळू हळू प्रयत्न केल्यास शक्य.
६. चालढकल थांबवा. गोष्टी वेळेत पूर्ण नाही केल्या तर उदासीनता, चिंता व तणावाला निमंत्रण.
७. आपल्या घरातील कामांवर नियंत्रण व व्यवस्थापन. प्रत्येकाने हातभार लावल्यास कमी वेळात घर किंवा ऑफिस नीटनेटके ठेऊ शकतो. फक्त स्त्रियांनीच जागा स्वच्छ ठेवणे ही भूमिका बदल केल्यास एकोपा वाढेल.
८. चांगले, फ्रेश वाटण्यासाठी काही गोष्टी जरूर कराव्यात. पाळीव प्राणी, मस्त गरम चहा, शॉवर, छंद काहीना काही असते जे आपला मूड ठीक करतात.

शेवटी आपण ठरवायचं कुठलं नैराश्य मी कमी करू शकतो आणि कुठले नाही. जे लगेच कमी होत नाही त्या बरोबर जगायचं आणि हळूहळू नाहीसे करायचे हीच तर जगण्याची खरी मजा आहे. चला तर मग शोधुया अशा गोष्टी ज्या आपल्याला मानसिक स्वास्थ्य ठेवण्यास मदत करतील व नैराश्याला दूर पळवतील….

 

©श्रीकांत कुलांगे
9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *