तक्रार व ताणतणाव

काल एका फॅक्टरीला भेट दिली आणि काही मित्र भेटले. बरेच जण आपल्या कामाबाबत काहीतरी तक्रार करत होते. थोडावेळ तक्रार ऐकून मी विचार केला व त्याबाबत अजून चर्चा करून कामाचा तणाव कसा कमी करता येईल असे उपाय सुचवले. रोज असेच प्रश्न आणि तक्रार अनेक जण कुठल्याही ठिकाणी करतात. काय होते यामुळें?

१. तात्पुरते मन हलके होते. ताण कमी होण्यासाठी हमखास उपाय.
२. पर्यायी व्यवस्था किंवा तणावाची कारणे शोधता येतात यावर उपचार करू शकतो.
३. सबुरीने घेतले की उगीच दुसरे घातक विचार मनात येत नाहीत.
४. कुणाचातरी मला सहारा आहे याची जाणीव होऊन मनाला तात्पुरती का होईना उभारी येते.

परंतु अशा तक्रारी जर नेहमीच असतील तर मात्र यात नकारात्मकता यायला लागते. आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला लागतात.

१. आपल्याबद्दल नकारात्मकता पसरली जाते. इतर ऐकून टिंगल करायची संधी सोडत नाहीत.
२. मेंदूला सवय लागली की तक्रार फक्त कामाबाबत नाही तर इतर गोष्टींबाबत सुद्धा करू लागतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
३. हे आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकते.
४. नंतर तुमच्या तक्रारी कुणी ऐकून घेत नाही.
५. आपल्याला मानसिक आजार जडण्याची शक्यता असते. त्यातून शारीरिक स्वास्थ्य बिघडते.
६. कामावर लक्ष लागत नाही किंवा फक्त शरीराने आपण तिथे उभे असतो, मनाने नाही.
७. मालक व कामगार यांच्यात दुरावा निर्माण होतो. घरातील व्यवस्था बिघडते.

औद्योगिक विकास करायचा असेल तर सर्वांच्या कामावरील ताणतणाव यांचे वेळीच नियोजन करणे अपेक्षित असते. ज्यानेकरून प्रोडक्शन मध्ये अडथळे येत नाहीत. कामगारांनी किंवा ज्याला कुणाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न व तक्रारी असतील तर त्यांनी योग्य पद्धत निवडायला हवी.

१. नेहमी तक्रार कुणी ऐकून घेत नाही म्हणून डायरी लिहायला सुरुवात करून आपले मन हलके होते. रोज त्यात लिहा आज काय वाटले.
२. मग त्याबाबत आपण काय करू शकतो, किंवा प्रश्न हा खरोखर आहे का याबाबत विवेचन आवश्यक आहे.
३. तक्रार करताना इतर जर पळून जात असतील किंवा लक्ष देत नसतील समजून घ्या की तुम्ही जरा अती करत आहात. समुपदेशन घेतले तर छान होईल. कदाचित तुमच्या विचार प्रणालीत काही चूक असेल, दुरुस्त करता येईल.
४. तक्रार ज्या बाबत आहे अशा थेट व्यक्तीकडे किंवा दिलेल्या मार्गाने केली तर त्यावर तोडगा निघेल. सिस्टिम कदाचित बदलणार नाही पण योग्य ठिकाणी तकार केल्यास त्याची दखल घेतली जाते.
५. तक्रारी बरोबर त्याला उत्तर शोधले तर उपाययोजना करण्यात येऊ शकतात.
६. थोडे मेडीटेशन, शांतता, व्यायाम, योग्य आहार यामुळे मन शांत होऊन स्थिरता येते.
७. खेळ, गप्पा गोष्टी, विनोद यांचा वापर केल्यास मित्र संगती सुसह्य होते.

कामावरील तणाव नेहमी जाणवणार आहे व तो कधीच संपणार नाही. योग्य तणाव व्यवस्थापन तणावाला आवर घालून, होणाऱ्या मानसिक आरोग्याची हानी टाळण्यासाठी उपयुक्त. घरी, अभ्यासात, चालता बोलता, ऑफिसात, नात्यागोत्यामध्ये, समाजात अशा तक्रारी नेहमी असतील. परंतु त्या कुठपर्यंत ताणायच्या हे आपल्या हातात ठेवले की भांडणे व घातक परिणाम नक्कीच टाळू शकु, अन्यथा दुष्परिणाम भोगायची मानसिकता तयार करा.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *