माझा २७ वर्षाचा तरुण मुलगा घरी बसून असतो व काही काम करायला किंवा मदतीला तयार नसतो म्हणून पालकाची तक्रार. नक्कीच ही गोष्ट अतिशय क्लेशदायक व दारुण .या अवस्थेतील असंख्य कुटुंबप्रमुखाची वाताहात होते, कुटुंब विस्कळीत होतात. अशा परिस्थितीमध्ये तरुण मुलं असं का वागतात आणि त्यांचे प्रश्न काय आहेत हे समजायला वेळ लागतो. जेव्हा आपापसातील समन्वय होत नाही तोपर्यंत हा प्रश्न प्रलंबित होतो आणि मानसिक त्रासाला सुरुवात होते. जेव्हा मी अशा तरुण मुलांशी बोललो, तेंव्हा काही मनातल्या गोष्टी बाहेर आल्या त्या म्हणजे;
१. आमचं कोणी ऐकत नाही आणि मनासारखे वागू देत नाही.
२. काही करायची इच्छा होत नाही.
३. मोटिवेशन ची कमी. नेहमी वडीलधारी व्यक्ती टोचून बोलतात. त्यामुळे राग वाढतो.
४. नेहमी धमक्या मिळतात की घर सोडून जा, त्यामुळे मनातून एक विद्रोही भूमिका जन्म घेते.
५. निराशा आणि चिंता काही करू देत नाही.
६. मोबाईल मधून इतर मित्रांशी बोलण्यात वेळ घालवावा वाटतो.
७. घेतलेल्या शिक्षणाचा फायदा दिसत नाही, नोकरी नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं ही भावना.
असं नाही की पालकांना या गोष्टींची जाणीव नाही पण त्यांच्याही बाजू आहेत, ज्या समजून घेणे गरजेचे;
१. मुलांच्या भूमिकांचं नीट आकलन न झाल्यानं कन्फ्युज होणे.
२. समस्यांना तोंड कसे द्यायचे याची कल्पना नसणे.
३. मुलांच्या समस्यांचे मूळ कारण शोधण्यात असमर्थता.
४. स्वतःची हालाखीची परिस्थिती व आर्थिक चणचण किंवा कामावरती असणारी ओढाताण.
५. स्वतःची निराशाजनक कामगिरी व म्हणून मुलांकडून जास्त अपेक्षा.
६. अपेक्षाभंग मुळे होणारी चिडचिड मुलांवरती किंवा परस्परावर निघते.
७. Covid-19 ज्या ठिकाणी सर्व जण घरीच आहेत त्यामुळे प्रश्न अजून वाढल्यामुळे मानसिक शांती पूर्णतः भंग झाली आहे.
८. एकमेकांत सकारात्मक संवाद नसणे.
अशा परिस्थितीमध्ये वातावरण संपूर्णतः नकारात्मक होते. त्याचा परिणाम जगण्याच्या पद्धतीवर होतो. तरुणांना व पालकांना संयुक्तिक पावले उचलण्याची गरज. काय करावं म्हणून काही उपाय कदाचित मदत करू शकतात;
१. समुदेशन – मुलं आणि पालक. संवाद सुरू होण्यासाठी मध्यस्ती शक्य. मानसशास्त्रीय तज्ञ चांगला पर्याय आहे. खूप एनजीओ फ्री समुपदेशन करतात.
२. पाल्य व पालकांनी सुरुवतीपासूनच एकमेकांना आदराने पाहावे. अहं कामाचा नाही.
३. आर्थिक चणचण समजण्याची मुलांची समज त्यांच्यात असते म्हणून तसे बोला.
४. घरेलु प्रश्न समजून घेतले तर ताणाचे व्यवस्थापन होते.
५. जर तरुण मंडळी ऐकत नसतील तर त्यांना अस्वस्थ करणारी कारणे समजून घेऊन चर्चा करुन प्रश्न सोडवता येतील.
६. अपेक्षा ऐवजी आहे त्या गुणांची कदर करून पुढे जाणे. मनस्ताप कमी होईल.
कित्येकदा काही तरुण प्राथमिक समुपदेशनाच्या पलीकडे असतील तर डॉक्टर ला जरूर भेट द्या. एक मात्र नक्की, कुटुंबात प्रेमाचे संबंध उत्तम असतील तर असे प्रश्न निर्माण होत नाहीत आणि झाले तरी सोडवणे सहज शक्य आहे. जर काही समस्या कठीण असतील तर समुपदेशन घेता येईल. शेवटी प्रत्येक कुलूपाची चावी असतेच ना!!!
© श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९