परीक्षेचे निकाल आले आणि काही ठिकाणी गम तर काही ठिकाणी ख़ुशी. खरेच का हे वर्ष आणि निकाल महत्वाचे असतात? म्हटले तर आहे नाही तर नाही. प्रत्येकाचे मत भिन्न असू शकते. एक पालक मात्र जाम खुश कारण त्यांच्या मुलातील चांगला मानसिक बदल त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. एका चांगल्या व्यक्तीने कसे असावे, राहावे हे महत्वाचे आणि मार्क्स किती पडले ते नाही. त्यांचे हे वाक्य ऐकून काही क्षण मी विचारात पडलो. त्यांना मनापासून धन्यवाद म्हणत शुभेच्छा दिल्या. अशी मुले पुढे कुठल्याही क्षेत्रात आपले नाव कमावत असतात. समजदार पालकांना चांगली समज असते. मग चांगली व्यक्ती व त्याचे फायदे मुलांच्या दृष्टिकोनातून काय आहेत ते समजून घेणे आज महत्वाचे आहे.
१. अशा मुलांना कुठेही आपलेसे केले जाते.
२. मानसिकता सकारात्मक असते. त्यामुळे अंतिम ध्येय गाठणे पुढे सोपे जाते.
३. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात पुढे राहतात. नेतृत्व करतात.
४. कुठलंही क्षेत्र त्यांना समान वाटतात त्याच्या फायदा त्यांना ऍडजस्ट करण्यासाठी होतो. UPSC पास आऊट झालेल्या व्यक्तींचे अनुभव जरूर ऐका.
५. त्यांना पुढे जाण्यासाठी स्वतःची तयारी महत्वाची वाटते. आपले रस्ते स्वतः शोधतात.
६. कुठला अभ्यास कसा व का करायचा याची जाणीव पटकन होते.
७. पुढे जाऊन आयुष्यात कसेही करून यशस्वी होण्याची धडपड करतात. मानसिक खंबीरता कामाला येते.
८. कधीच उपाशी राहणार नाहीत. काहीही करतील पण स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार सर्वप्रथम असतो.
चांगली व्यक्ती बनण्यासाठी जास्त विशेष काही करावे लागत नाही. ते गुण आपल्यात जन्मजात असतात पण काळानुरूप थोडा विस्कळीतपणा येतो आणि आपण रस्ता चुकतो. चांगली व्यक्ती होण्यासाठी सर्वात चांगला मार्ग कोणता आहे? सर्वात सोपा दृष्टीकोन कोणता आहे? स्वतःचे कल्याण तसेच इतरांचे हित विचारात घेतल्यास एक चांगली व्यक्ती बनण्याचे काही महत्त्वपूर्ण मार्ग येथे आहेत.
१. रागाला तिलांजली देणे. अवघड पण शक्य आहे. विचारबदल हळूहळू होतो.
२. इतरांना मदत करून भावनिकता व आपल्या शरीरात सकारात्मक बदल घडून यायला कारणीभूत.
३. आपल्या सामर्थ्याचा फायदा घ्यायला शिकणे. मुलांनी आपल्या मध्ये काय चांगले व वाईट हे शोधून त्यावर काम केले तर छान.
४. बदलाची अवस्था – समस्येकडे दुर्लक्ष करणे, समस्येची जाणीव करून घेणे. बदलण्यासाठी तयार होणे. ध्येय गाठण्याच्या दिशेने चालणे. व शेवटी, नवीन परिवर्तन स्वीकारून पुढे जाणे.
५. स्वतःची काळजी – आपल्या शरीराची, आत्म्याची आणि मनाची काळजी घेतल्याने ताणतणाव हाताळण्यासाठी शक्ती प्राप्त होणे. झोप, व्ययस्थित आहार, इतरांशी मनाने जुळणे महत्वाचे.
६. इतरांकरिता उपलब्ध असणे. ऐकणे, चर्चा करणे, सांत्वन किंवा प्रेरणा देणे.
या गोष्टी आपल्याला स्वतःची चांगली व वेगळी ओळख बनविण्यात मदत करते. ते नातेसंबंधात येणारा तणाव कमी करू शकतात आणि ते आपल्याला अधिक मजबूत बनवतात. आपल्या मुलांमध्ये असे गुण असतील नक्कीच पुढे जाऊन आपल्याला तणावाचा सामना करायची कमी वेळ येते. आता जमाना बदलतोय मग आपण पण बदलायला हवे. पहा काही परिवर्तन आपल्या वर्तनात आणि विचारात करता येतेय का ..चांगली व्यक्ती – सक्षम व्यक्ती.
@श्रीकांत कुलांगे
9890420209