त्रास देताय की करून घेताय?
आजकल मला याच्यामुळे, तिच्यामुळे त्रास होतो किंवा ते त्रास देतात हे अनेकांचे प्रॉब्लेम ऐकायला येत आहेत. काही पालक त्यासाठी भेटून पण गेले की मुलं एकमेकांना का त्रास देतात. थोडक्यात त्रास देणे ही जगभर व्याधी आहे आणि यावर कित्येक ठिकाणी संशोधन केले गेले. काही ठळक गोष्टी यातून पुढे आल्या आणि त्यांचा संबंध बऱ्याचदा आपल्या घराशी किंवा वातावरणाशी दिसून येतो. त्रास देणारे फक्त मुलेच नसतात तर त्यात आपल्यासारखी मोठी माणसे सुद्धा पुढे असतात.
मग आपण विचार करू की लोक का त्रास देतात? खालील गोष्टी संशोधनातून पुढे आल्या आहेत.
१. ताणतणाव आणि मनाला झालेला आघात: काही जण यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतात तर काही विरुद्ध मार्ग पत्करतात जसे की गुंडगिरी, हिंसा, मद्यपान व गैरवर्तन. त्यांना तणाव व्यवस्थापन माहित नसते.
२. आक्रमक वागणूक: त्रास देणारे बहुतांशी सभोवतालच्या समाजातील आक्रमक परिस्थितून शिकतात. बऱ्याचदा त्यांची वाढ अशीच होते की त्रास देणे हे पुरुषांचे काम आहे.
३. स्वतःचा कमीपणा झाकण्यासाठी इतरांवर रुबाब करण्यात धन्यता मानतात पण एकांतात मात्र आपल्यामध्ये ही गोष्ट का नाही म्हणून दोष पण देतात.
४. त्यांना कुणीतरी त्रास दिलेला असतो त्यामुळे नकारात्मक भूमिका तयार होते व ते दुसर्यांना त्रास द्यायला लागतात.
५. घरातील कठीण वातावरण – ज्याठिकाणी अशा व्यक्तींना मान-सन्मान न देणे किंवा झिडकारणे, प्रेमाने न वागवणे किंवा ज्या घरात नेहमी भांडणे असतील तर अशा व्यक्ती राग इतरांना त्रास देऊन काढतात.
६. शिक्षणाची कमी किंवा हवे ते व हव्या त्या ठिकाणी शिकायला न भेटणे.
७. नातेसंबंध – प्रेमातून किंवा नात्यातून आलेले वितुष्ट मनाला नकारात्मक बनवून मानसिकता बिघडवत असते.
त्रास देण्याऱ्या व्यक्तींना जर आपल्यात सुधारणा करण्याची इच्छा होत असेल तर खूपच छान कारण त्यातून समाज आणि कुटुंब व्यवस्था सुरळीत होत असते. अशा व्यक्तींनी काही गोष्टी करायला हरकत नाह।
१. मी भांडखोर किंवा त्रासदायक व्यक्ती नाही अशी भावना बाळगणे.
२. मी नेहमी इतरांना किंवा आप्तेष्टांना का त्रास देतो याचे कारण शोधून त्यावर उपाय करणे.
३. ताणतणाव व्यवस्थापन. समुपदेशन आणि इतरांना त्रास देताना आपल्याला सुद्धा त्रास होतो याची जाणीव करून घेणे.
४. याबाबत विश्वासू व्यक्तीबरोबर चर्चा करणे. मनमोकळे केले की इतरांना त्रास द्यायची इच्छा नाहीशी होते.
५. त्रास दिल्यानंतर समोरून होणारी प्रतिक्रिया कदाचित तुम्हाला त्रासदायक होऊ शकते. म्हणून काळजी घ्या.
६. मन शांत ठेऊन वरिष्ठांची सेवा, प्रार्थना, योग्य व्यक्तींच्या संगतीमध्ये वेळ घालवला तर लवकर आणि कायमस्वरूपी फरक पडतो.
७. त्रास देणे व करून घेणे दोन्ही गोष्टी वाईट. त्रास देणाऱ्या व्यक्ती कधीही सुख अनुभवत नसतात पण त्यांना ते समजत नसते. यातील काही व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात तर काही शारीरिक व मानसिक व्याधी दिसून येतात.
सभोवतालच्या व्यक्ती त्यांना सांगून थकून जातात की असे वाईट वागू नये. अशी एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबात असेल तर त्याला सर्वात प्रथम त्याच्या वेदना, प्रश्न समजून घेऊन समुदेशन जरूर करून घ्या. महत्वाचे म्हणजे आपण स्वतः यात कुठे बसतोय का असे आपल्या मनाला विचारायला विसरू नका…बघा काय समजतेय ते…
@श्रीकांत कुलांगे
9890420209