अरे तुझ्या इतका मोकळ्या मनाचा मी नाहीये असे जेंव्हा मित्र बोलला तेंव्हा मला त्याचे हसू आले. मोकळ्या मनाची माणसे इतरांसारखीच असतात ना मग हा फरक कसा ? हा मित्राला पडलेला प्रश्न. मी समजून सांगितले की मुक्त विचारधारा असून त्यात विविध प्रकारच्या कल्पना, युक्तिवाद आणि माहितीचा स्वीकार करणे समाविष्ट असते. मुक्त विचारसरणी असणे एक सकारात्मक गुणवत्ता मानली जाते. विवेकी आणि तर्कशुद्ध विचार करण्याची ही एक आवश्यक क्षमता आहे जी रोज आपल्या कामी येते. याउलट ज्यांचे मन मोकळे नसते असे माणसं फक्त स्वतःचे पाहतात व इतरांचा विचार शक्यतो कमी करतात.
मोकळ्या मनाच्या लोकांची काही वैशिष्ट्ये असतात जसे की,
१. इतरांना काय वाटते हे ऐकण्याची व त्यांच्याबाबतच्या विचारांची त्यांना उत्सुकता असते.
२. त्यांच्या कल्पनांना आव्हान देणारे त्यांना आवडतात व ते सक्षमतेने तोंड देतात.
३. जेव्हा ते चुकीचे असतात तेव्हा त्यांना राग येत नाही
४. त्यांना इतर लोकांबद्दल सहानुभूती असते.
५. स्वतःचे ज्ञान आणि कौशल्यांबद्दल नम्र असतात.
६.त्यांना विचारांची देवाण घेवाण करणे आवडते. त्यामुळे ते मुक्तपणे इतरांबरोबर बोलतात.
या लोकांमध्ये असे काय असते की ते एवढे फ्री माईंडेड वागतात? त्यांचे व्यक्तिमत्व, तज्ञ – जे करतात त्याबाबत माहिती घेऊन करणे आणि कुठल्याही गोष्टीला तोंड देण्याची सहजता, यामुळे त्यांना असे वागणे सोपे जाते.
मोकळ्या मनाने राहायचे असेल तर काही फायदे पण आहेत, जसे की :
१. स्वतःबाबत नवीन गोष्टी शिकणे व अनुभव मिळवणे. स्वतःच्या मनाची ओळख होणे.
२. जगाबरोबर राहून स्वतःची वैचारिक आणि सामाजिक वाढ होणे.
३. मानसिकदृष्ट्या मजबूत व आशावादी बनणे.
ज्यांचे मन मोकळे नसते अशा माणसांना स्वतःमध्ये बदल करण्यासाठी थोडे परिश्रम घ्यावे लागतात, मानसिकता बदलावी लागते. प्रयत्न करायचा असेल तर जरूर करा :
१. स्वतःला हव्या असलेल्या माहितीसाठी प्रश्न विचारा की ती किती खरी आहे, दुसरा पर्याय आहे का, इतर लागणारी माहिती आहे का…बोलते व्हा.
२. नकारात्मक उत्तर द्यायच्या अगोदर थोडा वेळ घ्या मगच उत्तर दिले तर सकारत्मकतेला वाव असतो. उगीच चुकीचे बोलून आपली किंमत कमी होते.
३. नम्रतेचा सराव व बौद्धिक पातळीवर विचारसरणी असेल तर सजून सोपे जाते. आपलेच खरे हा हेतू राहत नाही.
४. निरोगी मन ही किल्ली आहे मोकळ्या मनाची. समुपदेशन हा उपाय आहेच….. हसा व हसवा.
मोकळ्या मनाचा असणे कठीण आहे पण अशक्य नव्हे. अशा माणसांना समाज लवकर आपला करतो. त्यांना भेदभाव करायला आवडत नाही म्हणून सगळ्या प्रकारच्या भौतिक वास्तव्यात अशा व्यक्तींना त्रास कमी होतो. प्रत्येकाला आपल्या स्वभावाची ओळख चांगली असते, नसेल तर समोरची व्यक्ती आपल्याला करून देत असते. सभोवतालची परिस्थिती कशी बदलायची ती तुमच्या मनावर आहे, बघा काय हवे ते..
@श्रीकांत कुलांगे
9890420209