रोजचे काम करत असताना कित्येकदा आपल्या भावना अडथळा ठरत असल्याचे दिसून येते आणि जर भावनांना सकारात्मकपणे नाही वापरले आपल्याला यश संपादन करण्यात उशीर होतो किंवा अपयशी ठरतो. एकवेळ आपण दृष्टीकोन बदलू शकतो पण भावनांना आवर घालणे शक्य होत नाही. नकारात्मक भावना आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो. म्हणून भावनिक व्यवस्थापन करणे आपल्या हातात असल्याने ते कसे करता येईल याच्या विचार व्हायला हवा. भावना विशिष्ट ट्रिगरला त्वरित प्रतिसाद देतात. भावना व बुद्धी यांचा समतोल महत्वाचा आहे हे त्यामुळेच. विद्यार्थी, कामगार, अधिकारी – चालक मालक – सर्वानाच भावनात्मक निर्णयाचा फायदा कमी होताना दिसतो. त्यासाठी थोडे नियोजन केले तर आपले उद्दिष्ट साध्य होणे अवघड नाही.
भावनिक व्यवस्थापन कसे सुधारित करावे?
१. राग – लगेच निर्णय घ्यायच्या अगोदर थोडे थांबा. राग आवरला नाही तर तो अजून वाढतो. लगेच घेतलेले निर्णय घातक ठरतात. ज्याक्रियेमुळे राग येतो, ती क्रिया कदाचित आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो का हा प्रयत्न चांगला.
२. भीती – अपयशाची भीती आपले ध्येय गाठण्यास परावृत्त करते. वाटणारी भीती लायक मित्रांबरोबर चर्चा केली तर स्ट्रेस कमी होईल व उत्तर सुचतील. भीती चे विश्लेषण झाले कि येणारे प्रॉब्लेम्स सोडवण्यास मदत होईल. भीतीला न घाबरता दोस्ती केलेली केंव्हाही चांगली.
३. मत्सर – स्वतःशी इतरांशी तुलना करणे टाळा. आपला स्वतःचा बेंचमार्क स्थापन करणे. जेंव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेंव्हा त्रास जास्त होतो. हाच त्रास महत्वाचे काम करण्यास मज्जाव करतो.
४. अपराधी पणाची भावना – मी काहीतरी वेगळे करायला हवे होते अशी भावना आपल्याला भूतकाळात जखडून ठेवते. त्यापेक्षा त्यातून शिकून पुढे कसे केले पाहिजे हे विचार ठेवले तर यश मिळवण्यास वेळ लागत नाही. चुका पचवायला शिकले पाहिजे तेवढी ताकद आपल्यात तयार केली तर फायदा होतो. लोक पूर्ण केलेल्या कामांपेक्षा अपूर्ण किंवा व्यत्यय आलेले काम लक्षात ठेवतात त्यासाठी आपण आपल्याला दोषी ठरवतो.
५. दुखी – समजून घ्या. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हा उत्साह, काम कमी होते, इतरांपासून दूर राहतो. म्हणून समजून घ्या कि दुखी राहण्यात मजा नाही, आपले ठरवलेले ध्येय मिळविण्यासाठी हा अडथळा ठरतोय. दुःखाची कारणे जर सहजासहजी दूर करता येत असतील तर जरूर करा पण थांबू नका.
नकारात्मक भावना चुकीच्या समजुतीमुळे तयार होतात. वास्तविकता आणि प्रत्यक्षात अंतर आहे. आपल्या नियमित कामावर भावनांचा कसा प्रभाव पडतो हे समजून घेणे अतिमहत्त्वाचे असते. म्हणून स्वतःचे विचार व्यवस्थित ठेवून, काळानुसार पुढे जात राहणे हे आपल्या हातात आहे.
त्यासाठी आपण म्हणतो कुणाच्या भावनांशी खेळू नका कारण त्याच भावना एखाद्याचे भविष्य बिघडवू शकते. भावना या अशा असतात की नको त्यावेळी अवसानघात करतात.
@श्रीकांत कुलांगे
9890420209