वाचन आणि आपण

 

काही दिवसापूर्वी मित्राला विचारले की सध्या काय वाचतो आहेस, हसून म्हणाला वाचून बरेच वर्ष झालेत. सध्या फोनवर मेसेज नाही तर वर्तमानपत्र तेवढेच काय ते. विद्यार्थ्यांचे तर विचारूच नका, अगदी पोस्ट ग्रॅज्युएशनचे सुद्धा खूप कमी वाचताना आढळतात. कित्येक रिसर्च सांगतात की मुले आजकाल कमी वाचतात. असं का होतं म्हणून मी बरेच वर्ष निरीक्षण आणि प्रयोग करतोय. काही प्रयोग सकारात्मक रिझल्ट देऊन गेलेत तर काही अजून धडपड करत आहेत. काही अंशी काळ बदलत आहे हे जरी ग्राह्य धरले तरी डिजिटल मीडिया सुद्धा वाचावेच लागेल ना…तिथे सुद्धा खूप पुस्तके आहेत म्हणजे किंडल वगैरे. तरीपण वाचक वर्ग खूप कमी आहे. प्राथमिक कारणे सर्वसृत आहेत जसे की;
१. डोळ्यांचे प्रश्न – चष्मा जवळ नसणे, डोळे – डोके दुखणे, वाचताना झोप येणे, डोक्यात अनेक विचार.
२. कंटाळा, काय होणार वाचून ही भावना. वेळ नाही असे म्हणणे.
३. वाचायची सवय किंवा मोटिवेशन नसणे. मन विचलित होणे (उदा.मोबाइलला टोचणे)
४. आयुष्यात खूप वाचलेय आता काही गरज नाही असे विचार.
५. निराशा, चिंता, दडपण, मूड, मनाची किंवा सभोवतालची नकारात्मक परिस्थिती.
६. मुलांना पालक वाचताना दिसत नाहीत त्यामुळे त्यांना वाचनाचे महत्व समजत नाही.
७. आता लेख हे फिल्म, ऍनिमेशन द्वारे पाहायला भेटल्याने वाचनाचा कल कमी झाला असे काहीजण म्हणतात.

वाचनाला पर्याय ऐकण्याचा असून सुद्धा आपण तो निवडत नाही. आजकाल ऑडिओ बुक आलेत, कितीजण ऐकतात, खूप कमी. मग कुठे तरी प्रॉब्लेम आहे हे मानायला हवे व ते शोधून त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. वाचनाचे फायदे लहानपणी आपल्याला शिक्षक समजून सांगायचे, वाचून घ्यायचे, परंतु पुढे असं काय होतं की मुले पुस्तकाला हात लावायला नको म्हणतात? वाचन ही प्रक्रिया नेमके आपल्याला काय चांगली मदत करते हे समजून घेतले पाहिजे. उदा.
१. तणाव कमी करते, ज्यामुळे आपल्या हृदयाची गती आणि रक्तदाब सामान्य ठेवायला मदत होते.
२. स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, मेंदूची शक्ती किंवा विचार क्षमता वाढविणे.
३. ज्ञान मिळते – ग्रुप डिसकशन – भाषण चातुर्य, उत्सुफूर्त चर्चा सत्रामध्ये वापर होतो.
४. वाचनाचा ओघ (reading fluency ) मुळे वाचन करणं आनंददायी होते. लक्षात राहते.

आता महत्वाचा मुद्धा – काही विद्यार्थ्यांना कसे वाचावे हे समजलेले नसते मग त्यांनी काय करणे अपेक्षित आहे;
१. मोठ्याने उच्चारण करून वाचल्याने आपले उच्चार बरोबर आहेत की नाहीत ते समजेल – मार्गदर्शक समोर हवा.
२. एकदा उच्चारण समजले की मनात वाचून वेग वाढवता येतो. विद्यार्थ्यांनी जवळपास ३५० – ४०० शब्द मिनिटाला वाचायला हवे.
३. एखादा शब्द अर्थ नाही समजला तर शब्दकोश जवळ असू देणे.
४. एका दिवसात वेगवेगळी पुस्तके वाचून ठराविक गोष्टी ध्यानात ठेवणे विद्यार्थीदशेत प्रयत्नांनी शक्य होते.
५. वाचताना आपण हावभाव करून वाचले तर भावना दिसून येतात. कुठे थांबायचे, आवाज पातळी याबाबत चर्चा करावी.
६. एखाद्या शब्दावरून पूर्ण वाक्याचा अर्थ किंवा पॅराग्राफ ची कल्पना येण्यासाठी प्रयत्न असावेत.
७. जे काही वाचन करायचे त्याबाबत मनाची तयारी – कशाकरिता, काय सध्या करायचे – हे ठरविणे.

ज्या विद्यार्थ्यांनी वाचनकला आत्मसात केली ते आज उच्च पदावर आहेत. MPSC /UPSC चे निकाल पहिले तर ते समजून येईल. फक्त बुद्धीच्या जोरावर आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. अडीअडचणी असतील तर शिक्षकांशी बोला, समुपदेशन घ्या, मानसिक आरोग्याविषयी सल्ला किंवा शारीरिक अडचणी असल्यास तज्ज्ञांना भेटून वेळीच उपचार घ्या पण वाचा – कारण वाचाल तरच वाचाल हे सत्य आहे….

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *