दिल्लीहून मित्राचा अत्यंत हताश आवाजामध्ये आजच्या परिस्थितीबाबत वाईट अवस्थेतून जात असलेला फोन होता. आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक होत चालली आहे कारण शासनाकडून येणारे पैसे थकबाकीत, कामगारांना द्यायचे पगार बाकी, बँकेचे हप्ते आणि आहे तो आर्थिक व्यापाराचा डोलारा कसा सांभाळायचा याबाबत एक अत्यंत खंबीर माणूस बराचसा दिशाहीन दिसला. प्रॉपर्टी असून विकत घेणारा अशा वेळेस कुणी नाही, आर्थिक मदत बँकेकडून मिळत नाही, मित्रांकडून अपेक्षा करणे चुकीचे. अशावेळेस त्याला मानसोपचार पेक्षा आर्थिक उपचार हा अधिक महत्त्वाचा वाटतो. हीच परिस्थिती लॉक डाऊन मुळे पूर्ण देशात दिसते. कुठलेही मानसोपचाराचे फंडे कित्येकदा कामाला येत नाहीत असं त्याचं मत होतं. अशा परिस्थितीमध्ये धंदेवाईक व्यक्तीने आपला बिजनेस कसा चालवायचा याबाबत अनेक सीए किंवा अनेक आर्थिक सल्लागार वेगवेगळे सल्ले देतात.
मी यापूर्वी पण सांगितलं होतं की हे वर्ष covid मुळे फक्त आणि फक्त जिवंत (survival )राहणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. आर्थिक परिस्थितीला लगेच काहीच पर्याय नसतो, परंतु या निराशेपायी होणारे परिणाम जे त्यांनाही माहिती असतात पण लक्षात येत नाहीत.
१. शारीरिक कमजोरी, थोडक्यात अति विचार केल्याने आपल्या शरीरामध्ये बदल होतात विचार शक्ती कमी होते, हृदयविकार, मानसिक आजार आणि कुटुंबामध्ये नाराजी.
२. निर्णय शक्ती कमी होते.
३. आपला आत्मविश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो.
४. समाजामध्ये आपली किंमत कमी होत चालली असं वाटायला लागतं पण वास्तविक तसं नसतं.
५. लाईफस्टाईल बदलामुळे अजून निराशेत जातो.
६. आपल्या स्टाफ चे काय होईल याची चिंता.
७. अल्कोहोल, स्मोकिंग, ड्रग्स यांचे अतिसेवन.
८. आर्थिक परिस्थिती अजून खालावते.
आर्थिक नैराश्यातून बाहेर येण्यासाठी जास्त पर्याय नसले तरीसुद्धा ही निराशा कमी होण्यासाठी काही गोष्टी आपण करू शकतो त्या म्हणजे,
१. होणारा खर्च कुठल्या पद्धतीने कमी करू शकतो त्याची यादी बनवणे व त्या पद्धतीने प्रयत्न करणे.
२. अजून कुठले रस्ते आपल्या जवळ आहेत याची खातरजमा करणे.
३. थोड्या पैशांमध्ये अजून कुठला एखादा धंदा किंवा व्यवसाय सुरू करू शकतो का याची चाचपणी करणे.
४. लाज लज्जा समाज काय म्हणेल याचा विचार नंतर करायचा. कारण जो समाज आपल्या डोक्यावर घेतो तोच आपल्याला खाली टाकायला मागेपुढे पाहत नाही.
५. समुपदेशन चालू ठेवणे, मेडिटेशन – मन शांत ठेवल्याने निर्णय व विचार क्षमता पुर्निर्माण होण्यास मदत होते. नवीन विचारणा वाव मिळेल.
६. तुम्हाला फिजिकल फिटनेस ठेवावा लागेल.
७. सर्वात महत्वाच सकारात्मकता. तुम्ही फेल झालेले पहिले मनुष्य नाहीत. खूप लोकांनी शून्यातून पुन्हा विश्व निर्मिती केली आहे.
८. आर्थिक नियोजनाचा आढावा घ्या किती पैसे शिल्लक आहे, कसा पुरवायचा, कुठे बजेट कमी करायचं, हे ठरवायची वेळ आली असता डोके शांत ठेवून निर्णय घेतले तर जमेल.
मित्राला किती समजलं देव जाणे पण आपण काय करू शकतो हे प्रत्येकाच्या आवाक्यात असणारी गोष्ट आहे. प्रत्येकाला वाटत की समाज काय म्हणेल. हे नैसर्गिक संकट सर्वांनाच निर्वस्त्र करत आहे मग लाजायची काय गरज. सगळ्यांचाच प्रॉब्लेम तो आहे म्हणून ह्या वर्षी संघटित व जिवंत राहणं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे. जिवंत राहण्यासाठी आपल्याकडे सगळं काही असत, फक्त ती नजर हवी. मनुष्य म्हणून आपल्याला जगण्यासाठी मानसिक शांतता कसल्याही परिस्थितीमध्ये ठेवण्यात आपण यशस्वी झालो तर उद्या आपला आहे हि खात्री.
@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९