स्वयं शिक्षणाची पायाभरणी

 

लवकरच शाळा / कॉलेजेस सुरू होतील आणि पालक आप आपल्या परिस्थिती नुसार चांगल्या संस्थेत, क्लास मध्ये मुलांचे एडमिशन करतील. चांगली शाळा / कॉलेज असेल तर मुलं चांगली घडतील असा समज आपला असतो. परंतु जेंव्हा आपण निरीक्षण करु तेंव्हा समजेल की मुलं चांगली असतील तर कुठे पण शिकतील. आणि इथून पुढे सुरू होईल की काय श्रेष्ठ, शाळा की मुलं. बऱ्याचदा मी पालकांशी व मुलांशी बोलताना हेच सांगतो की स्वतःहुन आपण का शिकायला हवं. जो विद्यार्थी चांगला असेल तो नेहमी कुठेही काहीतरी शिकत असतो. त्याला चार भिंतीची गरज नसते. पालक, शिक्षक व मुलं यांचा समन्वय असेल तर चांगला फरक मुलांमध्ये दिसून येतो. आणि असं स्वयं शिक्षण लहानपणापासून जर तुम्ही घेत असाल तर ते तुम्ही जोपर्यंत शिकाल तिथपर्यंत कामाला येते.

मुलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी काही गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात त्या म्हणजे:
१. आपल्या पाल्यास महत्व पटवून देणे व प्रोत्साहीत करणे. काळाची गरज.
२. मुलं स्वतः काय करू शकतात त्या गोष्टींची सूची बनवा.
३. लक्ष्य ठरवून त्याप्रमाणे प्राधान्यक्रम बनवणे.
४. वेळेचा उपयोग कसा करायचा, ते ठरवणे.
५. अडथळे येणार – तडजोड हाच पर्याय.
६. १००% कुणीच परिपूर्ण नसतो.
७. जे चांगलं होतंय त्याबाबत स्तुती करणं. त्यांना त्याचे कारण सांगा.
८. आहे त्या परिस्थितीचा विचार करून मार्गस्त होणे.

ज्यांना, हे का करायचं आणि त्यामुळे काय होणार हे जेंव्हा समजणार त्यावेळी त्यांची मानसिकता आपोआप तयार होते. जर मुलांनी स्वयं शिक्षण प्रक्रिया सुरु केली तर त्यांना त्याचे फायदे समजायला लागतील.

१. स्वयं शिस्त तयार होणे. कुणालाही तु अभ्यास कर बाबा असं सांगायची गरज नाही.
२. आत्मविश्वास वाढणे. प्राध्यापकांकडे चर्चा करायला नेहमी तयार.
३. मानसिक सकारात्मक तयारी.
४. स्वतः कुठे आहोत याची जाणीव व त्याप्रमाणे पुढील मार्ग ठरविण्याची ताकद तयार होणे.
५. न्यूनगंड, भीती, निराशा, कंटाळा शक्यतो येत नाही. अडथळे आलेच तर काय करायचं हे पाहतात.
६. शिक्षणामुळे मला काय करता येईल याची जाणीव व्हायला लागते. शिकण्याची गोडी तयार होते.
७. पालकांना मुलांचा कल कुठे आहे हे समजते व त्यानुसार तयारी करता येते.
८. कित्येकदा वेगळ्या क्लास ची गरज पडत नाही. होमवर्क वेळेवर करण्याची सवय जडते.
९. पैसे, वेळ वाचतात.

आज मुद्दाम फक्त याच विषयावर लिहिण्याचे प्रयोजन केले कारण आज आपल्याला विचार करायला वेळ आहे. गरज नसेल तर पालकांनी मुलांना क्लास लावण्याचा हट्ट करू नये. त्यांना स्वतः शिकूद्या, धडपडू द्या, फक्त तुम्ही सपोर्ट करा. कारण पुढील शिक्षण हे बदलणारं आहे व जो करतो तोच टिकणार आहे. नोकरी सुद्धा अशाच युवकांना मिळेल ज्याला त्यातली प्रायोगिकता माहिती असेल. म्हणून अभ्यासाचे संतुलन करायला आपणच मुलांना शिकवायला हवे, व त्याकरिता त्यांना वेळ द्या अन्यथा वेळ कायमची निघून गेलेली असेल.

@श्रीकांत कुलांगे
989042029

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *