सकारात्मक राग

‘रॅशनल ईमोटिव्ह बिहेव्हियरल थेरपी’ REBT या मानसोपचार पद्धतीमध्ये भावनांचा सांगोपांग विचार केलेला आहे. त्यानुसार, नकारात्मक भावनांची तीव्रता कमी केली तर त्या उपयोगी होऊ शकतात. तीव्र चिंता, उदासी, क्रोध, अपराधीपणा, शरम, दु:ख आणि विकृत मत्सर या विघातक भावना माणसाच्या वर्तनावर विपरीत परिणाम करतात. मात्र मनातील समज बदलला, की भावनांची तीव्रता कमी होते. एखाद्या माणसाला खूप कर्ज झाले, ही घटना मनातील समजानुसार भावनांची तीव्रता बदलवते. मी इतके कर्ज घ्यायला नको होते; इतके न फेडता येण्यासारखे कर्ज माझ्यावर झाले म्हणजे मी अपयशी आहे; आता यामधून बाहेर पडणे अशक्य आहे- असा समज असतो, त्या वेळी तीव्र औदासीन्य येते आणि उद्योगपती वा शेतकरी आत्महत्या करतात. अशा वेळी मनातील समज बदलला, तर आत्महत्या टाळता येऊ शकतात. कर्ज खूप झाले आहे हे वाईट आहे, पण हा काही सर्वनाश नाही; मी अपयशी झालो असलो तरी यातूनही मार्ग निघू शकतो- हा विश्वास औदासीन्याची तीव्रता कमी करतो. कर्ज आहे त्यामुळे वाईट वाटायला हवे. तरच ते फेडण्यासाठी अधिक प्रयत्न होतील.

विघातक भावनांची तीव्रता कमी झाली, की त्या नकारात्मक राहूनही प्रेरक (motivational) होतात. काळजी, सकारात्मक राग, पश्चात्ताप, मार्ग बदलायला प्रवृत्त करणारी निराशा आणि कृतिप्रेरक मत्सर या चांगला तणाव निर्माण करणाऱ्या भावना आहेत. आत्मविकासासाठी त्या काही वेळ आवश्यक असतात. गांधीजींना आफ्रिकेत योग्य तिकीट असतानादेखील रेल्वेतून बाहेर काढले त्याचा राग आला, म्हणूनच ‘सत्याग्रहा’चा जन्म झाला! तेथील अन्य भारतीयांनी यावर उपाय नाही असे गृहीत धरले होते. गांधीजींना ते मान्य नव्हते, त्यामुळे त्यांना राग आला. मात्र त्यांच्या रागाची तीव्रता कमी होती. अन्यथा बेभान होऊन त्यांनी दगडफेक केली असती, तर सरकारने त्यांना लगेच अटक केली असती. तसे न करता ते प्लॅटफॉर्मवर शांतपणे बसले आणि ‘मला सन्मानाने रेल्वेत घेत नाही तोपर्यंत मी येथेच बसून राहणार,’ असा सत्याचा आग्रह त्यांनी धरला. ‘गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या,’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश असा सकारात्मक राग निर्माण करण्यासाठीच होता. आपणही विघातक भावनांची तीव्रता कमी करून त्या सकारात्मक पातळीवर आणू शकतो.

Shrikant Kulange

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *